बळ दे कल्पनेच्या पंखांना रणरणत्या वास्तविकतेचे… 🌎🔥🌪️💧☁️ पंचमहाभूतांवर कविता करण्याचा एक प्रयत्न.
‘प्रत्येक तत्वांकडून आपण काय घेऊ शकतो?’ या विचाराने कविता लिहिलेली आहे.
बळ दे कल्पनेच्या पंखांना रणरणत्या वास्तविकतेचे
जसा दरवळे सुगंध रातराणीचा विना अत्तरांच्या मदतीने ||
रंगवू दे कल्पनेच्या पंखांना निर्गुण नभासारखे
नभ मेघांनी आक्रमिले, झेलता झटके विजांचे |
गारा वादळ पाऊस वारे, अविचल नभ स्वाभिमानाने
उंचावून मान कणखर मानाने, मूळ राहे
नेहमी निरुप सदा, सप्तरंगच्या पलीकडचे ||
लहरूदे कल्पनेच्या पंखांना वायूच्या गतीने
पवन चलत कधी जलद गतीने
कधी सौम्य झुळूक हवीहवीशी वाटे |
झंकार करुनी शकतो नाश या अथांग विश्वाचा
परंतु तोच मात्र जगवतो संपूर्ण सृष्टीला
देहरुपी जपतो अस्तित्व अनमोल चैतन्याचे
महाशक्तीवान असा का नेहमी अदृश्य राहे?
बळ दे कल्पनेच्या पंखांना धगधगत्या ज्वालांचे |
धगधगत्या ज्वाला, साक्षात विशुद्ध पवित्रता
समर्पित करते सर्व, क्षणात काळ्या आईला
पणतीची वात, ते वणाव्याची हाक ऐकता
विनम्र नमन माझे, सगुण अग्निदेवतेला ||
आकारून दे पंख माझे निराकार जलासारखे |
रूप पाहता लोचने कधी दवबिंदुंचे
तान्ह्याने पाहिले ओंजळभर अमृताचे
भोगीने परीवर्तले संमोहित मदिरेचे
झाकू काळ्या आईला मुक्तीसाठी निळ्या शाईने?
संस्कार दे कल्पनेच्या पंखांना या हिरव्या धरतीचे |
किती उपकार फेडू या काळ्या आईचे?
आजन्म नतमस्तक होऊनी म्हणावे
सर्व दोष भोग दुःखांना पोटी घे सदा मायेने |
बळ दे तुझ्या या बाळाला प्रवाहाविरुद्ध पोहायचे
साकार करून स्वप्न आपले करूया कल्याण या विश्वाचे ||

